माऊलीच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.
इंद्रायणी काठावर वैष्णवांची मांदियाळी बघायला मिळाली. मोठ्या भक्ती भावात आणि उत्साहात ज्ञानोबा माऊलीच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. पहाटेपासूनच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू झाला. विधिवत महापूजा झाल्यानंतर पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मुख्य मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले होते. पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून वारकरी माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाले. ग्यानबा तुकारामाच्या गजराने अवघी आळंदी दुमदुमून गेली होती. प्रस्थानावेळी मुख्य ४७ दिंड्यामधील वारकरी, टाळकरी, ग्यानबा तुकारामाच्या तालावर ठेका धरला होता. टाळ मृदंगाच्या गजरात माऊलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले. माऊलींची पालखी श्री क्षेत्र आळंदीमधील गांधीवाडा येथील आजोळघरी मुक्कामी असेल.