गुरुचरित्र अध्याय 14 वा मराठी | Gurucharitra Adhyay 14 Marathi

                                                              ॥ गुरूचरित्र ॥

              ॥ अध्याय 14 वा ॥ सायंदेवाचे प्राणसंकट टळले

   श्री गणेशाय नमः॥ नामधारक सिध्दाला म्हणाला, ‘‘ हे योगीश्‍वरा, श्रीगुरू नृसिंह सरस्वतीनी उदरशुल ब्राम्हणाला याधी मुक्त केले, त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा.’’ सिध्द म्हणाला,‘‘श्रीगुरूंनी सायंदेवाची सेवा स्विकारली. त्याचा भक्तीभाव पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी त्याला ‘तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरूभक्त जन्माला येतील’ असा आशीर्वाद दिला.’’ सायंदेवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणला,‘‘गुरूदेव, आपला महिमा अगाध आहे. तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा, अखंड राहो, माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो. त्यांना सद्गती प्राप्त होवो. पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे. मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राम्हणांचा घात करतो. आज त्याने मलाच मारावयाचे ठरविले आहे. मी त्यांच्याकडे गेलो की माझा घात निश्‍चित आहे. मग आपले वचन खरे कसे होणार ।’’

   तेव्हा श्रीगुरूंनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, ‘‘सायंदेवा, चिंता करू नकोस, निश्‍चित होईल त्या यवनाकडे जा. तो तुला सन्मानाने परत पाठवील. तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. तू माझा भक्त आहेस. तुला पुत्रपौत्रादिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे.’’

   श्रीगुरूंनी अभय दिले आणि सायंदेवाची काळजीच मिटली. तो यवनाकडे गेला. त्या यवनाच्या रूपाने आपल्या समोर साक्षात यम उभा आहे असे त्याला वाटले. यवनाने सायंदेवाला पाहिले तो काय । तो त्याला अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसला. हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना त्याची मती कुंठीत झाली. तोंडातून शब्द निघेना तो संतापाने अक्षरशः थरथरत होता. त्याचे उग्र रूप पाहून सायंदेव भीतीने श्रीगुरूंचा धावा करू लागला. त्याच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली. ो कसाबसा घरात गेला. पलंगावर पडताच झोपी गेला. तेवढयात त्याला एक भयंकर स्वप्न पडले. त्यामध्ये एक तेजस्वी ब्राम्हण शस्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे असे दृश्य दिसले.तो दचकून जागा झाला. त्या वेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या. तो घाबरला या ब्राह्मणाचा घात केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले त्याने धावत जाऊन सायंदेवाचे पाय धरले. ‘‘ तुम्हाला येथे कोणी बोलावले ? कृपा करून आपल्या घरी जा.’’ असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषणे देऊन निरोप दिला.

    प्राणसंकट टळले होते । सायंदेव श्रीगुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदीतीरी गेला. कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले. यवनाकडील वृत्तांत सांगताना त्याचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते. तो म्हणाला,‘‘ गुरूदेव, आपण माझे रक्षणकर्ते आहात. आपल्या कृपेनेच मला जीवदान मिळाले. आता तुमची सेवा हाच माझा धर्म. मला तुमच्या बरोबर न्या.’’ तेव्हा श्रीगुरू म्हणाले, ‘‘सायंदेवा, आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत. पंधरा वर्षांनी परतून येऊ तेव्हा तुझ्या गावाजवळच राहू. त्यावेळी तू मुलाबाळांसह मला भेटायला ये. आता तू घरीच राहा. सुखाने संसार कर.’’

   श्रीगुरूंनी सायंदेवाचे सांत्वन केले आणि त्याची समजूत घालून त्याला घरी पाठविले. तेथून ते तीर्थयात्रा करीत शिष्यांसह वैजनाथ क्षेत्री गेले. तेथे स्वतःला कोठेही प्रकट न करता गुप्तपणे राहिले.’’ नामधारक म्हणाले, ‘‘महाराज श्रीगुरूंनी आपले अस्तित्व तेथे का प्रकट केले नाही ? त्यांच्या शिष्यांना त्यांनी कोठे पाठविले ?’’

    सिध्द म्हणाला, ‘‘सांगतो श्रीगुंरूचे चरित्र अतिशय थोर आहे. ते तू शांतपणे ऐक.’’

                                                ॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

Comments